कोल्हापूर : गोविंद पानसरे हत्येच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध असो! पानसरेंच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! चले जाव, चले जाव... मुख्यमंत्री चले जाव, नरेंद्र-देवेंद्र चले जाव, महाराष्ट्र शासन, हाय हाय! अशा घोषणा देत शनिवारी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. गोविंद पानसरे यांच्या हत्येला उद्या, सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समिती व डाव्या विचारसरणीच्या संस्था-संघटनांच्या वतीने पुरागामी विचारांचा जागर करण्यात येत आहे. याअंतर्गत शनिवारी पानसरे हत्येच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. दसरा चौकातून निषेध फेरीला सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्ते शासनविरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आले. त्यानंतर मेघा पानसरे, दिलीप पोवार, उदय नारकर, सुशीला यादव यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गोविंद पानसरे यांची हत्या धर्मांध, प्रतिगामी, सनातनी वृत्तीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी केली आहे. त्यांंच्या हत्येबाबत राज्य शासन, पोलिस विभाग गंभीरपणे चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा होईल, असे कोणतेही काम करीत नाही. किंबहुना गुन्हेगारांना अभय देण्याचेच प्रयत्न करीत आहे, असा संशय निर्माण झाला आहे. म्हणून कोल्हापुरातील सर्व पुरोगामी, डावे पक्ष, संघटना यांचा आम्ही निषेध करीत आहोत. गुन्हेगारांचा वावर कोल्हापुरात होता हे वेळोवेळी तपासात दिसून येते, असे पोलिसच सांगतात. मग त्यांना अटक का करीत नाही, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे. जिल्हाधिकारी म्हणून आमच्या भावना शासनाला कळविण्यात याव्यात. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपले सर्वांचे मुद्दे शासनापर्यंत पोहोचवू; तसेच सध्या तपास कोणत्या पातळीवर सुरू आहे याची विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी कॉ. अतुल दिघे, एस. बी. पाटील, विक्रम कदम, बाबा यादव, एम. बी. पडवळे, रघुनाथ कांबळे, विक्रम कदम, बाबूराव तारळी, उमेश पानसरे, जमीर शेख, सीमा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोन संशयित आरोपी पकडण्यापलीकडे तपास गेलेला नाही. हे पाऊलसुद्धा पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे उचलले गेले. सनातन संस्थेच्या साधकांनी कोल्हापुरात येऊन प्रक्षोभक भाषणे केली. ‘हे आमचेच हिंदुत्ववादी सरकार आहे. आमच्या नादाला लागू नका,’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.- प्रा. डॉ. मेघा पानसरे गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी केलेल्या तपासाची गती पाहता हे सरकार खुन्यांच्या पाठीशी आहे का? अशी शंका येते. खुन्यांचा शोध लागून त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलने सुरूच ठेवणार आहोत. फक्त आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील. - दिलीप पवार प्रमुख मागण्या अशाहत्येचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक व्हावी व तपास अधिकाऱ्यांची बदली केली जाऊ नये.विनय पवार व सारंग अकोळकर या आरोपींना फरार घोषित करण्यात यावे.शासन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने तपासाबाबतची भूमिका स्पष्ट करावी.
तपासात दिरंगाई; सरकारचा निषेध
By admin | Published: February 18, 2017 11:51 PM