लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनांच्या ऑनलाईन व्यवहारात ओटीपीचा अडथळा निर्माण होत असल्याने पुणे आरटीओ कार्यालयात जवळपास पाच हजार वाहनांचे व्यवहार रखडले आहे. व्यवहार अपूर्ण राहात असल्याने आरटीओच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुण्यासह राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात आता वाहनांचे हस्तांतर, बोजा कमी करणे आदी कामे ऑनलाईन केली जात आहेत. हे करताना वाहनधारकांना ओटीपी दिला जातो. हा ओटीपी समाविष्ट केल्याशिवाय वाहनांचा व्यवहार पूर्ण होत नाही. यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे.
सर्वात महत्वाची अडचण म्हणजे ज्या वाहनांचा आता व्यवहार केला जात आहे, तो चार ते पाच वर्षांपूर्वीचा. काही वाहने दहा वर्षांपूर्वीची आहेत. त्यावेळी काहींनी घरचा दूरध्वनी क्रमांक दिला तर काहींनी मोबाईल क्रमांक दिला. मात्र सध्या तो मोबईल क्रमांक वापरात नाही. आरटीओकडून देण्यात येणारा ओटीपी हा त्यावेळी नोंदविलेल्या क्रमांकावर जातो. आता तो क्रमांक बदलण्याची कोणतीही यंत्रणा आरटीओकडे नाही. परिणामी गाड्यांचे व्यवहार पूर्ण होत नाहीत.
कोट :
“आरटीओने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली ही चांगली बाब आहे. मात्र यात काही त्रुटी आहेत. आरटीओने त्या तत्काळ दूर केल्या पाहिजेत. या मागणीसाठी आम्ही परिवहन आयुक्तांना भेटलो. यावर त्यांनी आश्वासन दिले.”
-बाबा शिंदे, अध्यक्ष, महारष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघ.