लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनानंतर आता राज्यात म्युकरमायकोसिस आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा आहे. राज्यासाठी ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही संबंधित कंपन्यांना संपर्क केला. परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत, असं कंपन्यांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायची हे केंद्र शासन ठरवत आहे. केंद्र सरकारच्या अडचणीमुळे इंजेक्शन मिळण्यास उशीर होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सक्षम आहे.
पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यावर त्यांनी जिल्ह्याबद्दलही माहिती दिली. पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी जाणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात आता सर्व प्रकारचे बेड्स असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱी इंजेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यांचा तुटवडा आहे. मात्र, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. या इंजेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इंजेक्शन्स केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नसल्याची माहितीही पवारांनी यावेळी दिली.
आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर यांचा तुटवडा नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
-----
काळजी घ्या... हारतुरे बंद करा बाबांनो
विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठक संपल्यानंतर पक्षाचे काही कार्यकर्ते ‘‘दादा तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे,” असं म्हणत पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र अजित पवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुष्पगुच्छ घेण्यास नकार देत, आरे जिल्ह्यात, राज्यात काय परिस्थितीत आहे, याचा अंदाज तरी आहे का?, कोरोना महामारीच्या संकटात हा पुष्पगुच्छ कोणाकडून आला, त्याला कोरोना होता का, नव्हता? काही माहिती नाही. आता तरी हारतुरे बंद करा, बाबांनो काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर फोटोपुरता त्या पुष्पगुच्छाला हात लावत लगेच तिथून काढता पाय घेतला.