--
पौड : ''''तहसीलदार हटवा मुळशी वाचवा’चा नारा देत तहसीलदारांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने भरपावसात निषेध आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोग व शासनाच्या आदेशांची पायमल्ली करून मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण हे मनमानी कारभार करत असून प्रशासनाने केलेल्या चुकांच्या दुरुस्त्या आणि अन्य महसूली कामांसाठी सामान्य नागरिकांना महिमोनमहिने चकरा माराव्या लागतात. याशिवाय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील विविध गावांमधील मतदार याद्या सदोष तयार करण्यात आल्या असल्याने तालुक्याचे प्रशासन प्रतिनिधी म्हणून अभय चव्हाण यांना तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करीत शिवसेनेने पौड येथील तहसील कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.
मुळशीचे तहसीलदार हे एखाद्या पक्षाची सुपारी घेतल्यासारखे काम करत असून सर्वसामान्य माणूस तसेच शेतकऱ्यांनी अनेक वेळा चकरा मारूनही कामे होत नाहीत . बावधनला बसून तलाठी कामकाज करत आहेत. मुळशीतील प्रशासनाचे कामकाज चुकीच्या पद्धतीने चालले असल्याचा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे ,बाळासाहेब चांदेरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी पौड ( ता.मुळशी ) येथे केला . युवासेना पुणे जिल्हा तसेच मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदार हटवा , मुळशी वाचवाचा नारा देत बोगस मतदार रद्द झाले पाहिजेत ही मुख्य मागणी करत पौड तहसिलदार कार्यालयाबाहेर भर पावसात आंदोलन करण्यात आले. ''''तहसीलदार हटवा,मुळशी वाचवा'''' या आशयाचा फलक हातात घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाषणे व घोषणाबाजी करत सुमारे दीड तास हे आंदोलन केले.
युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे यांनी तहसीलदार व त्यांच्या समवेतच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर मुळशीतील प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा पाडा वाचला.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे , सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे , जिल्हाप्रमुख रमेश कोंडे , युवासेना जिल्हा प्रमुख अविनाश बलकवडे , शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ , विद्यार्थी सेना जिल्हा संघटक राम गायकवाड,जिल्हा संघटिका संगीता पवळे, स्वाती ढमाले यांनी तहसिलदार अभय चव्हाण यांच्या कारभारावर टिका केली . यावेळी युवासेना तालुकाप्रमुख संतोष तोंडे , शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ , ज्योती चांदेरे आदी उपस्थित होते.
--
शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्याडून प्राप्त झालेला अर्ज मोघमपणे दिलेला आहे. मतदार यादीत ज्या नावाबाबत आक्षेप आहे त्यासंबंधीची आक्षेपासंबंधी आवश्यक ते वैयक्तिक नावाचे पुरावे या अर्जाबरोबर जोडणे आवश्यक होते. निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर रोजी जी अंतरिम यादी निश्चित केली आहे त्यात आमच्या पातळीवर बदल करणे शक्य नाही. त्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.
- अभय चव्हाण ,तहसीलदार मुळशी
--