पिंपरी : अनधिकृत मोबाईल टॉवर तीन दिवसांत हटविण्यात यावेत अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सुरेश जाधव यांनी बुधवारी दिला. प्राधिकरण परिसरातील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करावी, या संदर्भात २००९ पासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने समितीने गुरुवारी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, उपोषणाची मुख्याधिकाऱ्यांनी दखल घेतली व बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. आकुर्डीतील कार्यालयात बैठक झाली.या वेळी समिती अध्यक्ष विजय पाटील, कार्यकारिणी सदस्य मनोहर दिवाण, मनोहर पद्मन, एम. गोपीनाथन, पोलीस उपनिरीक्षक सचिन सुभाष सूर्यवंशी, आर. के. म्हाळसकर, विश्वनाथ आंचन, के. एस. पंडित, मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच सेक्टर २८ मधील रहिवासी उपस्थित होते. सुमारे दीड तास बैठक सुरू होती. या वेळी समितीच्या सदस्यांनी परिसरातील अनधिकृत मोबाईल टॉवरची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिली. वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाटील म्हणाले, ‘‘प्राधिकरण परिसरातील अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई होत नाही. प्राधिकरणात अनधिकृतपणे ५५ टॉवर असून, त्यांपैकी एक सेक्टर २८ मध्ये आहे. त्यामुळे सरकारचा महसूल तर बुडत आहे. याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत आहे. कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागत आहे.’’(प्रतिनिधी)
अनधिकृत मोबाईल टॉवर हटवा
By admin | Published: February 26, 2015 3:17 AM