पुणे : सेना-भाजपा युती तुटल्यामुळे समीकरणं बदलत असून, ते अपरिहार्य आहेत. पण, मतदारांकडून विश्वासार्हता पाहिली जाईल आणि दीर्घ काळापर्यंत कोण कुणाचा मित्र आहे हेसुद्धा तपासले जाईल, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. सध्या भाजपाचे शक्तिप्रदर्शन म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा कार्यक्रम चालू आहे. तात्पुरती रंगरंगोटी करून शक्तिप्रदर्शन होत नाही, जे काही आहे ते अंत:करणात असावे लागते. शिवसेनेच्या द्वेषावर आधारित भाजपाने जे उसने अवसान आणले आहे, लोकांनाही माहीत आहे हा काय प्रकार आहे ते असे सांगून त्या म्हणाल्या, की लोकसभेला आमची युती होती; पण विधासभेला तुटली. परंतु, नंतर शिवसैनिकांनी सत्ता आणि समाज यांमधला दुवा म्हणून काम करावे, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. ही निवडणूक महापालिकेची आहे; पण कोणालाही विश्वासात न घेता स्मार्ट सिटीचा विषय असेल किंवा मेट्रोचा विषय असेल भाजपा आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला वगळण्याचे राजकारण केले. जे काम करीत आहे त्यात चित्र दिसत आहे, की सर्वच भागात आम्हाला चांगले उमेदवार मिळाले आहेत. पक्षाने स्वतंत्र जाण्याची भूमिका घेतल्याने बऱ्याचशा लोकांना तिकिटामध्ये स्थान मिळून त्यांच्यात उत्साह संचारला आहे. पुणेकरांमध्ये सातत्याने राष्ट्रवादीकडून जातीयतेचे राजकारण आणि तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला गेला, तर भाजपाने मोठ्या प्रमाणावर आयारामांना प्रवेश दिला आहे. सत्तेसाठी जो हापापलेपणा झाला तो पुण्यातील सांस्कृतिक नगरीमध्ये चारित्र्यसंपन्नतेचा आग्रह धरून राजकारण सुधारणेसाठी प्रयत्न करतात. त्यांनी केलेल्या विचारांचा हा पराभव आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल त्यांच्या सामाजिक सेवेचा पायाच जर भाजपाने डळमळीत केला असेल तर आपण कुणाला मजबूत करतो आहोत, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आमची प्रचारमोहीम जोरात सुरू आहे. २० वॉर्डांत जाऊन आम्ही प्रचार केला आहे. येरवडा, पर्वती भागात गेलो, महिला आणि युवकांची संख्या प्रचारात चांगली आहे. जे लढत आहेत त्यांच्याप्रति मतदारांचा विश्वास दिसून येत आहे. त्यामुळे भाडोत्री लोक प्रचारात दिसले नाहीत. शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी आहे. रिंगरोडसाठी जमिनी जात आहेत त्याच्यासाठी एमएसडीआरसीबरोबर आम्ही बैठक घेणार आहोत.
युती तुटल्याने समीकरणं बदलणारच
By admin | Published: February 16, 2017 3:32 AM