पुणे : खाजगी कंपनीतील उच्च पदस्थ ६० वर्षाच्या महिलेची ३ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरीयन आरोपींना बँक खात्याचा वापरण्यास देणाऱ्या व्यावसायिकाला सायबर पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. निमेश राजेश राजन (वय २७, रा. सैनिक एनक्लेव्ह, मोहन गार्डन, पश्चिम दिल्ली) असे या व्यवसायिकाचे नाव आहे. राजन याचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. एक ते दीड टक्का कमिशन घेऊन तो मनी ट्रान्सफर करण्याचे काम करतो. आरोपीने जादा कमिशनचे आमिष दाखविले. त्याने आरोपींना मनी ट्रान्सफर करण्यासाठी त्याचे बँक खाते वापरण्यास दिले होते. या प्रकरणातील पैसे त्याच्या खात्यात आल्यावर त्याने कमीशन घेऊन दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर हे पैसे पुढे आरोपींच्या खात्यात पैसे गेले होते.
नायजेरीयन आरोपींनी एका खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करणाऱ्या ६० वर्षाच्या महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. त्या महिलेस इंटरनॅशनल फोनद्वारे संपर्क करुन महागडे गिफ्ट पाठविल्याची बतावणी केली. ते एअरपोर्टवर अडविले असून त्या सोन्याचे दागिने व परदेशी चलन आहे, ते क्लिअर करण्याच्या बहाण्याने त्यानंतर या प्रकरणात झालेल्या अटकेतून सोडविण्यासाठी, जेलमधून बाहेर काढणे तसेच वैद्यकीय उपचार सुविधेसाठी पैसे लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळलले.
त्यानंतर त्यांना धमकावून आयकर विभागाला माहिती देण्याची भिती दाखवून एकूण २५ बँकांमधील ६७ बँक खात्यावर एकूण ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये पाठविण्यास भाग पाडले होते. सायबर पोलिसांनी दिल्लीतून यापूर्वी ३ नायजेरीयनांना अटक केली होती. या ३ नायजेरीयन आरोपींना फसवणुकीसाठी बँक खाते पुरविणार्या अनेकांपैकी राजन हा एक आहे. त्याला सायबर पोलिसांनी दिल्लीहून अटक केली.पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके. सहायक आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, कुमार घाडगे, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, सचिन गवते, व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली.
बँक खाते वापरु न देण्याचे आवाहन-
ऑनलाईन पद्धतीने सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे आरोपी व बक्षिसाचे, नोकरीचे, लॉटरी, कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखविणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांपासून नागरिकांनी सावध रहावे. वेगवेगळी कारणे सांगून तुमच्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगतो. त्याबदल्यात कमिशन देण्याचे आमिष या टोळ्या दाखवितात. त्यामुळे कोणालाही आपले बँक खाते वापरण्यास न देण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी केले आहे.