पुणे : पाणीवाटपाचे निर्णय घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात कालवा समितीची बैठक होणे अपेक्षित असताना जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ही बैठक झालेली नाही. कालवा समितीची बैठक घेण्यास जाणूनबुजून उशीर केला जात आहे, असा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी रविवारी केला. कारखान्यांच्या उसासाठी जादाचे पाणी सोडण्यासाठी तर हा विलंब केला जात नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.सजग नागरिक मंच व परिवर्तन संस्थेच्या वतीने ‘पक्षनेते व नागरिक : जनसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर बोलत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी, परिवर्तन संस्थेचे तन्मय कानिटकर उपस्थित होते. पाणीप्रश्न, फ्लेक्समुळे होणारे विद्रूपीकरण, वॉर्ड सभा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आदींबाबत राजकीय पक्षांच्या भूमिका काय आहेत याची विचारणा या वेळी नेत्यांना करण्यात आली.प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर जास्तीचे पाणी वापरतात असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता, त्यानुसार तो पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र त्यासाठी कालवा समितीची बैठकच घेतली गेलेली नाही. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बैठक मार्चपर्यंत घेता येणार नाही. तरी पालकमंत्र्यांनी येत्या ३ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा.’’विनायक निम्हण म्हणाले, ‘‘शहराला ट्रॅफिक प्लानर हा अधिकारी नाही, त्यामुळे बहुतांश उड्डाणपुलांची रचना चुकलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरोग्यप्रमुख मिळालेला नाही. सर्वसामान्य नागरिकांवर भार टाकून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविणे योग्य नाही.’’सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘नगर रोड बीआरटीसाठी रिपाइंच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मीटर बंधनकारक करून २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यास हरकत नाही.’’पीएमपी सक्षम व्हावी असे भाजपालाच वाटत नाही, अशी टीका किशोर शिंदे यांनी केली.(प्रतिनिधी)
कालवा समितीच्या बैठकीला मुद्दाम उशीर
By admin | Published: January 02, 2017 2:34 AM