पुणे : बस प्रवासात अल्पवयीन मुलीला खेटून उभे राहिल्याबद्दल तिकीट चेकरकडे तक्रार केल्याने बस कंडक्टरने या मुलीच्या कमरेला जाणीवपूर्वक ३ वेळा हात लावून विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार बस प्रवासात घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली आहे.प्रशांत किसन गोडगे (वय ३०, रा. कात्रज कोंढवा रोड, कात्रज) असे अटक केलेल्या पीएमपी बस कंडक्टरचे नाव आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी येथे राहणार्या १७ वर्षाच्या मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्वारगेट ते विश्रांतवाडी या बस प्रवासात वेस्टएंड चित्रपटगृह ते विश्रांतवाडी प्रवासादरम्यान शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या स्वारगेट ते पुणे या बसने प्रवास करीत असताना फिर्यादी या बसमध्ये उभ्या असताना बसचा कंडक्टर प्रशाांत गोडगे हा फिर्यादीला खेटून उभा राहिला. त्यावर फिर्यादी यांनी त्यास तुला बाजूला उभा राहण्यास जागा नाही काय असे विचारले. तिकीट चेकर गाडीतमध्ये आले असताना त्यांच्याकडे फिर्यादी यांनी तक्रार केली. त्याचा राग मनात धरुन प्रशांत गोडगे याने फिर्यादीकडे डोळे वटारुन पाहून त्यांच्या कमरेला मुद्दामहून तीन वेळा हात लावून त्यांचा विनयभंग केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कंडक्टरला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.