लाखेवाडी : सध्या मूल जन्माला येणेसुद्धा प्रचंड खर्चिक झाले आहे, छोट्या खासगी प्रसूतीगृहात नॉर्मल बाळांतपणासाठी दहा हजारांच्या आसपात तर सिझरिंगसाठी तब्बल २५-३० हजारांचा खर्च येतो. या वाढत्या खर्चामुळेही अनेकदा लिंगनिदान करून मुलींना गर्भातच संपविण्याचेही प्रमाण वाढत आहे.त्याला आळा घालण्यासाठी येथेल डॉ. गणेश राख यांनी त्यांच्या रुग्णालयात मुलगी जन्मल्यास प्रसूतीचा खर्च मात्र करून नव्या मुलीच्या स्वागतासाठी केक व मिठाई वाटून रुग्णालयात आनंदोत्सव करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. याबाबत डॉ. राख यांच्याशी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे ‘लोकमत’ने त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले. ‘या बेटी बचाओ’ जनआंदोलनात आतापर्यंत दोन लाखा-पेक्ष्या जास्त वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला आहे. हजारो लहान खाजगी दवाखाने, काही मोठे कापोर्रेट दवाखाने व इतर दवाखान्यानी बेटी बचाओ जनआंदोलन या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या दवाखान्यात मुलगी जन्माला आल्यास मोफत प्रसूती किंवा आर्थिक सूट दिलेली आहे. तसेच लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत, कॅलेंडर, दैनंदिन डायरीवर बेटी बचाओ जनआंदोलनाचा उल्लेख करणे, तसेच निरनिराळ्या राज्यात बेटी बचाओ जनआंदोलनाच्या मिरवणुकींचे आयोजन करणे अशा अनेक मार्गानी बेटी बचाओ जनआंदोलन पुरस्कार केला जात आहे. १६ लाखांपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बेटी बचाओ जनआंदोलन या उत्साहवर्धक उपक्रमात सहभाग घेतलेला आहे.या स्वयंस्फूर्त स्वयंसेवकामध्ये निम्न-वैद्यकीय क्षेत्र, वकील, प्राध्यापक , शिक्षक, सराफ , ज्वेलर्स, नाभिक, प्रवासी कंपन्या, विवाह आयोजक व सर्वसामान्य रिक्षावले यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन ज्या सामाजिक व आर्थिक बाबीमुळे मुलीचा जन्म निषिद्ध ठरविला गेला, त्या बाबतीत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला.परिस्थितीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. विशेषत: समाजातील गरीब व मध्यम वर्गाच्या लोकांच्या मनस्थितीत असा बदल झाला आहे की, हे लोक पूर्वी मुलगी झाल्यास वैद्यकीय बिलाचा खर्चसुद्धा द्यावयास तयार नसायचे.परंतु, आता परिस्थिती बदलली आहे, अनेक कुटुंबे आता मुलीच्या जन्माचा स्वीकार करीत आहे.लॅनसेट मेडिकल जर्नल २०१८ यांच्या अहवालानुसार गेल्या अनेक वर्षांत लिंगभेदभावामुळे ०-५ या वयोगटातील २.४० कोटी म्हणजेच दरवर्षी २.४० लाख मुलींना मारून टाकण्यात आले आहे. हे सर्व मृत्युकांड टाळता येण्याजोगी होते. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. केवळ प्रसूती खर्च माफ केल्याने जनजागृती होणार नाही ती केवळ एक सुरुवात आहे. महिलांना सन्मान मिळण्यासाठी आपला लढा असल्याची माहिती डॉ. गणेश राख यांनी दिली.
मुलगी जन्मल्यावर प्रसूती खर्च माफ; डॉ. गणेश राख यांचं स्तुत्य पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 2:33 AM