पिंपरी : ‘हेल्पिंग हँड’ या नावाने सुरू केलेले संस्थेचे कार्यालय पिंपळे सौदागर येथील वरुण पार्क सोसायटीत आहे. त्या ठिकाणी असलेल्या रेणुका अनाथाश्रमात नियमबाह्य पद्धतीने दोन अल्पवयीन मुले, दोन मुली ठेवली असल्याची तक्रार लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळाली. संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गुरुवारी सायंकाळी ६च्या सुमारास आश्रमावर धाड टाकली. संस्थेतील कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यात त्रुटी आढळून आल्या. सांगवी पोलिसांच्या मदतीने आश्रमातील मुलांची सुटका केली. त्यांना नियमबाह्य पद्धतीने ठेवणाऱ्या हेल्पिंग हँड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हेल्पिंग हँड संस्थेचे अध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष सुनील जामनिक यांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारपूस केली. शासनाच्या बालकल्याण समितीची परवागनी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्था जरी नोंदणीकृत असली, तरी अनाथाश्रम सुरू करून नियमबाह्य पद्धतीने अल्पवयीन मुलांना ठेवल्याप्रकरणी संस्थेचे पदाधिकारी जाधव आणि जामनिक या आरोपींविरुद्ध बालअधिनियम आणि भारतीय दंडसंहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या बालकल्याण समितीची कोणतीही परवानगी नसताना, अनाथाश्रम सुरू करून त्यामध्ये अल्पवयीन मुलांना ठेवले असल्याची तक्रार ‘सखी’ या संस्थेकडे आली. या तक्रारीची दखल घेऊन सखी संस्थेच्या प्रमुख, सामाजिक कार्यकर्त्या अंजली पवार यांनी शासनाच्या बालकल्याण समितीला याबाबत कळविले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सखी’च्या पवार यांना बरोबर घेऊन आश्रमाची पाहणी केली. बुधवारी सायंकाळी सहाला त्यांनी अचानक भेट देऊन आश्रमाची पाहणी केली असता, चार अल्पवयीन मुलांना कोंडून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिलेली जागा छोटी आहे. छोट्याशा खोलीत त्यांना ठेवले असून, खाण्या-पिण्याची योग्य प्रकारे सुविधा नसल्याचे आढळून आले. आजुबाजूच्या रहिवाशांकडे त्यांनी विचारपूस केली असता, मुलांना कायम कुलूपबंद ठेवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे गुरुवारी बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या पथकाने अनाथाश्रमावर धाड टाकली. आश्रमातील मुलांची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. आश्रम संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)
बेकायदा अनाथाश्रमातून बालकांची सुटका
By admin | Published: February 27, 2015 6:01 AM