मार्गासनी : वेल्हे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या प्रसूती यंत्रणेमुळे भोर्डी (ता. वेल्हा) येथील गर्भवती महिला व बालकाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.वेल्हे तालुक्यातील भोर्डी येथील भाग्यश्री गणेश आखाडे (वय २०) यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पासली येथे आणण्यात आले. परंतु प्रकृती धोकादायक असल्याने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात रात्री तीन वाजता आणण्यात आले. त्यानंतर येथील रुग्णालयातील अधीक्षक डॉ. मधुकर परदेशी व वैद्यकीय अधिकारी विलास मेमाणे यांनी रुग्णालयात प्रसूती करण्याचे ठरविले; परंतु तिला अशक्तपणा जास्त होता. अगोदरच पासली ते वेल्हा खडतर प्रवास झाला असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. पुढे ७४ किलोमीटरवर पुणे येथे पाठविणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी तिथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. परंतु झोपूनदेखील प्रसूती करणे अवघड होते. मग तिला झुलत्या प्रसूती यंत्रावर बसवले. त्यानंतर अडीच तासांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता यंत्राच्या मदतीने प्रसूती करण्यात आली. अतिशय किचकट आणि अवघड असलेली प्रसूती झुलते यंत्र आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे प्रसूती यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले.वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम आणि दळवळणाचा अभाव असलेल्या या तालुक्यात शासकीय डॉक्टर आणि यंत्रामुळे माता व बालकाचे प्राण वाचले असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर परदेशी आणि डॉ. विलास मेमाणे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व यंत्रणेचे ग्रामस्थांकडून आभार मानले जात आहेत. (वार्ताहर)
प्रसूती यंत्रामुळे दोघांना जीवदान
By admin | Published: March 16, 2017 2:08 AM