आणे : येथील श्रीरंगदास स्वामीमहाराज सामुदायिक विवाह मंडळाची सामुदायिक विवाह नियोजनाची बैठक शनिवारी झाली. यात महिला व बालविकास विभागाकडून सामुदायिक विवाह सोहळ््यात विवाह केल्यास वधूपक्षाला दहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते, गतवर्षी झालेल्या विवाहासाठीचे १८ धनादेशांचे वितरण वधूमातांना या बैठकीत करण्यात आले़पुणे जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेली एकेकाळची सामुदायिक विवाहाची चळवळ सध्या मंगल कार्यालयांच्या गर्दीत हरवून जात असताना श्रीक्षेत्र आणे येथील श्रीरंगदास स्वामीमहाराज सामुदायिक विवाह मंडळ जोमाने व नि:स्वार्थपणे दरवर्षी सामुदायिक विवाहांचे आयोजन करीत आहे़ सद्भावना व नि:स्वार्थ सेवा हा उद्देश समोर ठेवून गावातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन २००४ मध्ये श्रीरंगदास स्वामीमहाराज सामुदायिक विवाह मंडळाची स्थापना केली़ या मंडळाचे एकूण ३५ सभासद असून दरवर्षी दोन वेळा सामुदायिक विवाह आयोजिले जातात़ साखरपुडा, टिळा, वराची मिरवणूक, विवाह, कन्यादान असे सर्व विधी एका दिवसात पार पाडले जातात़ विवाहासाठी लागणारे साहित्य, हार-तुरे, बाशिंग, वधूसाठी फुलांची वाढी, वाजंत्री, भटजी अशी सर्व व्यवस्था मंडळाकडून केली जाते़ तसेच प्रशस्त पार्किंग, उत्तम जेवण, पिण्याचे पाणी, भव्य मंडप अशा सुविधा दिल्या जातात़ या मंडळाच्या माध्यमातून शाळेतील मुलांना शालेय साहित्यवाटप, खाऊ वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात़ माळीण दुर्घटनाग्रस्तांना मंडळाने अकरा हजार रुपये आपद्ग्रस्त निधी म्हणून मदत दिली होती़ तसेच सर्व समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वरांचे विवाह अल्प खर्चात केले जातात. गेली चौदा वर्षे नि:स्वार्थ सेवा करीत असताना शिल्लक राहिलेल्या निधीतून मंडळाने २२०० चौ. फूट क्षेत्रफळाची तीन मजली भक्तभवन इमारत बांधून श्रीरंगदास स्वामीमहाराज देवस्थान संस्थेला हस्तांतरित केली आहे़ जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पठारावर असलेला आणे व परिसर आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून अशा विवाहाच्या माध्यमातून या भागातील जनतेला दिलासा देण्याचे काम हे मंडळ करीत आहे़ यावर्र्षी ७ मे व १४ मे या तारखांना सामुदायिक विवाहाचे आयोजन केले आहे.
वधूमातांना अठरा धनादेशांचे वितरण
By admin | Published: April 24, 2017 4:29 AM