तळेघर : फलोदे (ता.आंबेगाव) येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्युप्रकरणी दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आखिल भारतीय किसान सभेच्या वतीने चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक नांदापूरकर यांना देण्यात आले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील फलोदे या गावातील पुनम दत्तात्रय लव्हाळे ही बावीस वर्षीय महिला वेळेत प्रसूती न झाल्यामुळे मरण पावली. त्यासोबतच तिच्या पोटातील बाळही दगावले, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उपलब्ध होऊ न शकणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून घोडेगावला शासकीय रुग्णवाहिका कशामुळे उपलब्ध झाली नाही, ते पाहून यास जे कारणीभूत असतील, त्या संबंधितावर कारवाई व्हावी, ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव येथे सदरील महिलेवर कोणतेही उपचार न करणाऱ्या डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेघर व आंबेगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी भागात निवासी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर, अडीवरे व तिरपाड येथील विविध तक्रारींविषयी जनसुनावणी घ्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, सचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजू घोडे, लक्ष्मण मावळे, अशोक जोशी, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, देवकी भोकटे, सुनील पेकारी उपस्थित होते.
१३तळेघर
चौकशी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करताना किसान सभेचे पदाधिकारी.