बारामती : जिल्ह्यात रेमडेसीवीरच्या मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त आहे. ही वस्तुस्थिती आहे.परंतु डॉक्टरांनी सर्व रुग्णांना हे इंजेक्शन देण्याऐवजी टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार इंजेक्शन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
बारामतीत शुक्रवारी (दि.१६) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मुलन आढावा बैठक पार पडली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ.देशमुख माध्यमांशी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, स्टॉकिस्ट व हॉस्पिटलकडून सध्या ४२ हजार इंजेक्शनची मागणी आहे.परंतु जिल्ह्यात कोअर कमिटीने निर्णय घेतल्यानुसार थेट हॉस्पिटललाच आपण इंजेक्शन पुरवठा करत आहोत. त्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, एफडीएचे अधिकारी त्या कामात आहेत.मागील तीन दिवसात १२ हजार इंजेक्शन्स हॉस्पिटलला दिली आहेत.रेमडेसिविरच्या निर्यातीला केंद्राकडून बंदी घालण्यात आली असून गुरुवारी दिल्लीहून विमानाने ३५०० इंजेक्शन पुण्यात आणली असुन ती पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राला देण्यात आली आहेत. हॉस्पिटलची मागणी व रुग्णसंख्या गृहित धरून इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे.तालुका पातळीवर इन्सिडन्स कमांडरला यात सहभागी करून घेण्यात आले आहे. सध्या सर्वच रुग्णांसाठी इंजेक्शन मागितले जात आहे.त्याची बिलकुल गरज नाही.गरज असलेल्या व्यक्तिलाच इंजेक्शन द्यावे.दुसरीकडे रेमडेसीवीरच्या उत्पादन वाढीसाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दीड हजार पदांसाठी मुलाखत घेण्यात आल्या यामध्ये ९०० पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. काही पदांच्या भरतीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. उपलब्धता होईल, तसे मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहोत.
ऑक्जिनची मागणी पोहोचली ३२१ मेट्रीक टनावर...गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात ७५ मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता.ती मागणी आता ३२१ मे.टनावर पोहोचली आहे. ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या तीन कंपन्या आहेत. त्या राज्यभर ऑक्सिजन पुरवतात. जिल्ह्यात १६ रिफिलर आहेत. उत्पादित कंपन्या व रिफिलरच्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शासनाच्या निदेर्शानुसार उत्पादित होणारा १०० टक्के ऑक्सिजन फक्त आरोग्य सेवेसाठी वापरला जात आहे.---------------------------