पुणे : खासगी मालकीची जागा ताब्यात घेऊन महापालिकेने उभारलेल्या संगम पुलाजवळील संगमघाटावर दुमजली पार्किंगमध्ये ‘पे अॅण्ड पार्किंग’ची प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ मात्र, ही प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करून, येथील पार्किंग नागरिकांना मोफत उपलब्ध राहावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे़
याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, महापालिका गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे़ यात संगमघाट येथे पुणे महापालिकेने खासदार निधी व नगरसेवक निधीमधून दोन मजली पार्किंग उभारले असल्याची आठवण करून देत, या पार्किंगशी धर्मादाय आयुक्तांशी काहीही संबंध नसताना व दशनाम स्मशानभूमीच्या नावाखाली पार्किंग भाडेपट्ट्याने देण्याचा घाट सध्या चालू असल्याचे सांगण्यात आले आहे़ सदर ठिकाणी पे अॅण्ड पार्किंग झाल्यास येथे दशक्रिया विधी व धार्मिक विधीसाठी येणाºया दु:खी व कष्टी लोकांकडून पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे़ यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, व पे अॅण्ड पार्किंगची प्रशासकीय प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करावी असे या निवेदनात शिवसेनेने सांगितले आहे़ तसेच, ही प्रक्रिया रद्द न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे़
----------------------------