चाकण : कोरोनाच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विकेंड लॉकडॉउनसह संचारबंदी लागू केली आहे. मात्र चाकण एमआयडीसीमधील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने औद्योगिक परिसरातील गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव वेगाने वाढत आहे. यासाठी काही दिवस चाकण औद्योगिक वसाहत बंद ठेवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने कामगार येतात. तसेच अनेक कामगार चाकण शहरासह औद्योगिक परिसरातील सावरदरी, वासुली, शिंदे, भांबोली, वराळे, आंबेठाण, बिरदवडी आदी गावांसह वाड्यावस्त्यांवर भाडे तत्वावर राहत आहेत. कंपनीत कामावर जाणाऱ्या लोकांपासून स्थानिक नागरिक घरात असूनही त्यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. यासाठी काही दिवस तरी औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद ठेवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यासह वरील गावांमधील नागरिकांनी केली आहे.
* संचारबंदी नावाला -
"लोहा गरम है मार दो हातोडा" या म्हणीप्रमाणे पैसे कमावण्याची हीच वेळ चांगली असल्याने अनेकांनी राज्य शासनाच्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावत दिवसभर गुपचूप आपले व्यवसाय सुरू ठेवले आहेत. संचारबंदी असूनही अनेक लोक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. जे कोरोना बाधित रुग्ण आहेत परंतु लक्षण दिसत नाही असे अनेक जण मोकाट बाहेर फिरत आहेत. यावर स्थानिक प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही.
* कंपन्यांकडून कोरोनाचे नियम धाब्यावर -
एमआयडीसीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून कच्च्या पक्क्या मालाची लहान मोठ्या वाहनांमधून वाहतूक केली जाते. वाहनचालक व त्याच्या सोबतच्या लोकांची तसेच वाहनांना कंपनीच्या आत प्रवेश देताना सॅनिटाझर करणे आवश्यक आहे. कामगारांना ने - आण करणाऱ्या बसेसही पूर्ण क्षमतेने भरून वाहतूक केली जात आहे. एकंदरीत एमआयडीसीमधील सगळ्याच कारखान्यांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. सद्य स्थितीत चाकण एमआयडीसीमधील शंभर कामगारांपैकी किमान वीस जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.