भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी भादलवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या परमिट रूममध्ये दारूचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मद्यपींनी हॉटेलच्या वेटर आणि मॅनेजर यांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने एकत्र येत दहशत निर्माण करीत जबर मारहाण करूनही आरोपींवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या भादलवाडी गावाजवळच्या परमिट रूममध्ये हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी पळसदेववरून दारू पिण्यास आलेल्या ग्राहकाला बिलाचे पैसे मागितल्याचा राग आला.वेटर आणि ग्राहक यांच्यात वाद झाल्याने मॅनेजरने मध्यस्थी करीत प्रकरण मिटविले. परंतु दारूच्या नशेतील तरुणांनी हॉटेलबाहेर जात फोन करून आपल्या मित्रांना याबाबतची माहिती देत बोलावून घेतले. काही वेळातच दहा-पंधरा जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये येत धुडगूस घालीत कामगारांना मारहाण केली.या वेळी हॉटेलचा वेटर मारहाण चुकवून हॉटेलच्या वरच्या मजल्यावर गेला असताना काही तरुणांनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण करीत वरून खाली फेकण्याची धमकी दिली. बेदम मारहाण आणि धुडगूस घालण्याचा हा प्रकार अर्धा तास सुरू होता. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी नीलकंठ राठोड यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांचे पथक या ठिकाणी पाठवून धुडगूस घालणाऱ्या टोळक्याला जेरबंद करून पोलीस ठाण्यात आणले.पोलीस ठाण्यात हॉटेल कामगार सौरभ यदुनंदन दुबे याने प्रशांत पोपट गांधले, अक्षय शंकर गायकवाड, अक्षय शंकर काळे (रा. पळसदेव), उदय अरुण भोईटे (रा. कुंभारगाव) यांच्याविरोधात तक्रार दिली. मात्र हॉटेलमालक आणि धुडगूस घालणारे तरुण यांच्यात समेट झाल्याने अखेर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.मार बसलेल्या परप्रांतीय कामगारांनी मारहाणीची भीती घेतल्याने गावाला निघून जाण्याची तयारी केली आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तक्रारदारांनीच तडजोड केल्याने अदखलपात्र गुन्हा नोंदला असल्याचे सांगत भिगवण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असा धुडगूस घालणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. तक्रारदार तडजोडीची भूमिका घेत असल्यामुळे दहशत माजविणाऱ्यांचे फावते, परंतु असा प्रकार परत घडल्यास आरोपींविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे संकेत या वेळी बोलताना दिले.
अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष हॉटेलमध्ये दारू पिऊन पैसे देताना दादागिरी करण्याचे प्रकार भिगवण परिसरात काही वर्षांपूर्वी सुरू होते. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अशा तळीरामांची सुपर धुलाई करीत कडक कारवाई केल्याने असे प्रकार थांबले होते. आता पुन्हा तळीरामांनी डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने विद्यमान अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.