लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये संस्थात्मक स्तरावर आणि मॅनेजमेंट कोट्यात नियमबाह्य पद्धतीने झालेले प्रवेश पुढील चार दिवसांत रद्द करावेत, या मागणीसाठी पालकांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) कार्यालयावर सोमवारी निदर्शने केली. तसेच या जागांवर पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवून गुणवंत विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नामांकित १२ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॅप फेरीतून शिल्लक राहिलेल्या जागा, तसेच मॅनेजमेंट कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यातील जागांची प्रवेशप्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली होती. त्याबाबत युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे तक्रार दाखल केली होती. सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागाने या कॉलेजांच्या प्रवेशप्रक्रियेची तपासणी केली असता, हे प्रवेश नियमानुसार झाले नसल्याचे आढळले होते. तसेच संस्थास्तरावरील जागांचा कॉलेजच्या संकेतस्थळावर उल्लेख केला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सीईटी सेलने या कॉलेजांना ई-मेल पाठवून नियमबाह्य प्रवेश पुढील प्रक्रियेत प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून रद्द करण्यात येतील, असा इशारा दिला होता. मात्र, या निर्देशांना कॉलेजांनी केराची टोपली दाखविली. या कॉलेजांतील नियमबाह्य प्रवेश रद्द करून त्या जागांवर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे घ्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
४ पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्याला कम्प्युटर सायन्स पुण्यातील व्हीआयटी कॉलेजमध्ये ४, ११, १३, २१ एवढे कमी पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्ससारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या आणि महत्त्वाच्या विषयाला प्रवेश दिला आहे.
याबाबतचे पुरावे पालकांनी सीईटी कक्षासमोर दिले आहेत. हे प्रवेश गुणवंत विद्यार्थ्यांना डावलून दिल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला.
प्रवेशप्रक्रियेला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी आहे. संस्थात्मक स्तरावर नियमबाह्य पद्धतीने झालेले प्रवेश रद्द करून सीईटी सेलने त्या जागांवर नव्याने प्रवेशप्रक्रिया राबवावी. - कल्पेश यादव, सहसचिव, युवा सेना