पुणे : पुण्यातील एमपीएससी आणि यूपीएससी अभ्यासिकांच्या चालकांकडे खंडणी मागितली जात असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कणसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश घरबुडे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला. या पत्रकार परिषदेत काही व्हॉट्सॲप चॅट्स आणि महेश घरबुडे यांचे विविध नेत्यांसोबतचे फोटोही पत्रकारांसमोर सादर करण्यात आले.यावेळी, नागपूर येथील बजाज नगर पोलीस ठाण्यात महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी घरबुडे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची माहितीही देण्यात आली. मात्र, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल का होत नाही, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.प्रदीप कणसे यांनी दावा केला की, महेश घरबुडे आणि लक्ष्मण हाके यांनी कालच सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली आहे. या सगळ्या प्रकरणात उच्च पातळीवर दबाव टाकून चौकशी रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय संभाजी ब्रिगेडने व्यक्त केला आहे.संभाजी ब्रिगेडने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून महेश घरबुडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, संबंधित प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पुण्यात एमपीएससी क्लास चालकांकडून खंडणीची मागणी ? संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:05 IST