पुणे: महाशिवरात्रीमुळे मार्केट यार्डातील भुसार विभागातून भगर, साबुदाणा आणि शेंगदाणा या उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थ्यांची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्यामुळे घाऊक बाजारात साबुदाणा व भगरीच्या भावात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी घसरण झाली आहे. तर पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शेंगदाण्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.
राज्यातील नाशिक जिल्हा, कर्नाटक आणि छत्तीसगड येथून भगरीचे उत्पादन घेतले जाते. बाजारात दररोज ३० ते ४० टन भगरची आवक होत आहे. सोमवारी घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या भगरीला प्रतिकिलोस ८५ ते ९० रुपये, तर दोन नंबर मालास ८० ते ८५ रुपये भाव मिळाला. देशात केवळ तामिळनाडू येथील सेलम भागात साबुदाण्याचे उत्पादन घेतले जाते. तेथून सगळीकडे माल निर्यात होत असतो. बाजारात दिवसाला साबुदाण्याची १५० ते २०० टनाहून अधिक आवक होत आहे. उच्च गुणवत्तेच्या साबुदाणाला प्रतिकिलोस ५० ते ५५ रुपये भाव मिळत आहे. तर, दोन नंबरच्या साबुदाणाला प्रतिकिलोस ५० ते ५२ रुपये भाव मिळत आहे.
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून घुंगरू, स्पॅनिश, जाडा, टीजे शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे. बाजारात शेंगदाण्याची आवकही चांगली असून दर्जाही चांगली आहे. बहुतांश शेंगदाणा खाद्य तेलासह मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात घुंगरू ९० ते १०० ते रुपये, स्पॅनिश ११० ते ११७ रुपये, जाडा ९० ते १०० रुपये तर टीजे शेंगदाण्याची ७२ ते ७५ रुपये किलो दराने विक्री सुरू असल्याचे लोढा यांनी सांगितले.
महाशिवरात्रीमुळे मार्केटमध्ये उपवासाच्या पदार्थांना चांगली मागणी आहे. साबुदाणा व भगरीच्या भावात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी घसरण झाली असून साबुदाणा व भगरमध्ये किलोमागे ५ ते ७ रुपये स्वस्त झाली आहे. - आशीष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड