पुणे : दिवाळी तोंडावर आलेली असताना रेल्वेने पुण्याहून एकही विशेष रेल्वे सोडली नाही. दिवाळीनिमित्त दि. १२ ऑक्टाेबर राेजी फक्त मोजक्याच रेल्वेंचे एसी थ्री टियर कोच वाढवल्याचे सांगितले. रेल्वे सर्वसामान्यांचा विचार करत आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
पुणे रेल्वे विभागाकडून दरवर्षी गणेशोत्सव, उन्हाळी सुट्या आणि छटपूजेसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येते. सध्या नियमित सुटणाऱ्या सर्व रेल्वे फुल्ल झाल्याने प्रवाशांकडून विशेष दिवाळी स्पेशल रेल्वेची मागणी केली जात होती. तरीही केवळ एसी काेच वाढवून प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
पुण्याहून जाणाऱ्या, सुटणाऱ्या सर्व रेल्वे फुल्ल झालेल्या असताना रेल्वेने विशेष रेल्वे सोडणे गरजेचे होते. तसेच ज्या रेल्वेंना एसीचे कोच लावले त्या ऐवजी स्लीपर अथवा द्वितीय श्रेणीतील कोच लावणे आवश्यक होते. रेल्वेच्या या निर्णयामुळे अधिक पैसे कमवण्याच्या उद्देशाने नागरिकांना बळजबरी एसीचेच तिकीट घ्यायला रेल्वे प्रशासन भाग पाडत आहे. यातही फक्त नागपूर दिशेने जाणाऱ्या रेल्वेंचेच कोच वाढवले असून इतर जिल्ह्यांमध्ये अथवा राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे काय, हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
अजूनही पुणे रेल्वे विभागाकडे वेळ असून, त्यांनी लवकरात लवकर विशेष रेल्वेसह स्लीपर, द्वितीय श्रेणीतील कोच वाढवावेत, जेणेकरून प्रत्येकाला त्याच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करता येईल.
या रेल्वेंना जोडले एसी कोच
- दर गुरुवारी पुण्याहून सुटणाऱ्या पुणे-नागपूर एक्स्प्रेसला दि. २०, २७ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी, तर दर शुक्रवारी नागपूरहून सुटणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेसला दि. २१, २८ ऑक्टोबर आणि ४ नोव्हेंबर रोजी चार एसी थ्री टियर कोच लावले जाणार आहेत. या रेल्वेचे तिकीट १ हजार २५५ रुपये आहे.
- दर शनिवारी पुण्याहून सुटणाऱ्या पुणे-अजनी एक्स्प्रेसला दि. २२, २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर रोजी, तर दर रविवारी अजनीहून सुटणाऱ्या अजनी-पुणे एक्स्प्रेसला दि. २३, ३० ऑक्टोबर आणि ६ नोव्हेंबर रोजी चार एसी थ्री टियर कोच लावले जाणार आहेत. या रेल्वेचे तिकीट १ हजार ४२५ रुपये आहे.
- दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी पुण्याहून सुटणाऱ्या पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेसला दि. २२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान, तर नागपूरहून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी सुटणाऱ्या नागपूर-पुणे गरीब रथ एक्स्प्रेसला दि. २१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान दोन एसी थ्री टियर कोच लावले जाणार आहेत. या रेल्वेचे तिकीट ८७० रुपये आहे.