पुणे: शहर आणि परिसराचा वेगाने विकास होत असल्यामुळे येथून लांब पल्ल्याच्या गाड्या वाढविण्याची मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे पुण्यातील चार रेल्वे स्टेशन विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये उरळी येथे सर्वांत मोठे टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी संसदेत बुधवारी दिली.
अधिवेशनात अनेक खासदारांनी पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. यावर बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे शहर व परिसर हा एक समृद्ध आहे. पुणे हे शैक्षणिक हब बनले आहे. त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते. त्यामध्ये जबलपूर, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून पुण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे. पुण्यातून रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी तेथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये चार रेल्वे स्टेशनचा विकास केला जात आहे.
पुणे रेल्वे स्टेशनचे रिमॉडलिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याबरोबरच हडपसर टर्मिनल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. उरुळी येथे मोठे टर्मिनल विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी उतरून ती गाडी पुढे उरुळीला जाईल. त्या ठिकाणीच गाडीची देखभाल दुरुस्ती होईल. ती गाडी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनमार्गे प्रवास करील. या स्टेशनच्या विकासामुळे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. त्याचा फायदा प्रवाशांना निश्चित होईल, असे सांगण्यात आले.