सासवड : सासवड नगरपालिकेने दारूबंदीचा ठराव करूनही उत्पादनशुल्क विभागाने दुकानाला परवानगी दिली आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला अखेर आज नगरपालिकेवर धडकल्या. ठरावाची तातडीने अंमलबाजवणी करा, अशी मागणी करीत हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.दारूबंदीचा ठराव उत्पादन शुल्क विभागाला कार्यवाहीसाठी पाठवावा, गरज असल्यास दारूबंदीसाठी वॉर्डनिहाय मतदान घेण्याची प्रक्रिया करावी, निवासी क्षेत्रामध्ये व्यावसायिक वापरास परवानगी देऊ नये, आवश्यकता असल्यास नगराध्यक्षांनी नगरपालिका अधिनियमातील कलम ५८ (२)चा वापर करावा, उत्पादन शुल्क विभागाने ज्या सर्व्हे नंबर ७३/१ मध्ये दारूदुकानाला परवानगी दिली, तेथील प्रभागातील महिलांचे मतदान घेऊन परवानगी रद्द करावी आदी मागण्या या वेळी महिलांनी केल्या. तसे निवेदन त्यांनी नगराध्यक्षांना दिले.याबाबत दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास पुन्हा धरणे, मोर्चा, लाक्षणिक उपोषण या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. हेच निवेदन सासवड येथील उत्पादन शुल्क कार्यालयातही देण्यात आले. मोर्चामध्ये सिद्धिविनायक सोसायटीतील महिला उपस्थित होत्या. यात विजय गिरमे, स्वाती कटके, सागर ओचरे यांनी डॉ. उदयकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे नियोजन केले. या वेळी पालिकेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेविका वसुधा आनंदे, माया जगताप, पुष्पा जगताप, सीमा भोंगळे, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, प्रवीण भोंडे, दिनेश भिंताडे, गणेश जगताप, हिरामण हिवरकर आदी उपस्थित होते.सासवड शहरात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी ठराव करणारी राज्यातील ही पहिली नगरपालिका आहे. दारूबंदी विषयात आम्ही नागरिकांबरोबर आहोत, असे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.नगरपालिकेने ठराव केल्यानंतर तो लगेचच उत्पादनशुल्क विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविला आहे. नगरपालिकेला काहीच न कळवता उत्पादनशुल्क विभागाने दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आह.यात नगरपालिकेचा काही संबंध नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपालिका त्यांच्यासमवेत आहे. नगरपालिकेच्या विकासकामांत अडथळा आणून नगरपालिकेला बदनाम करण्याचे काही लोकांचे कारस्थान आहे, असा आरोपही या वेळी भोंडे यांनी केला.
दारूबंदीसाठी पालिकेवर धडकल्या महिला, ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:51 AM