नारायणगाव : नारायणगाव एसटी आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक आदी ४ संघटना व कृती समिती यांच्या वतीने एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच पदनिहाय वेतनश्रेणी लागू करावी आदी प्रलंबित मागण्यासांठी दि.१७ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारला आहे. पहाटेपासून बस स्थानक पूर्ण रिकामे दिसून येत होते. दरम्यान कर्मचा-यांना बसस्थानक परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आल्याने कर्मचा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . या आंदोलनात नारायणगाव आगार कामगार संघटनेचे अध्यक्ष सिकंदर इनामदार, सचिव गणेश गाढवे, किशोर शेळके, सुभाष चव्हाण, दत्ता हाडवळे, संतोष नरवडे, अशोक फुलसुंदर, संजय शेडगे, पूनम हांडे, सीमा बांगर, एल. एम. डोके, सायली परदेशी, पी. एन. राऊत, राजश्री पवार, सीमा वामन, प्रतीक्षा कोकणे, सुधीर फुंदे, गणेश रासकर, संजय गाडेकर, मुन्ना पटेल, दत्ता भोईर, प्रकाश राजगडे, संजय थोरात, दौलत शेळके, आरिफ पटेल आदी कर्मचारी सहभागी झाले होते. यासंपात १७९ चालक, १४५ वाहक, ३० वर्कशॉप कर्मचारी सहभागी झाले होते. या संपामुळे आज ७८० होणा-या फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले, अशी माहिती आगर प्रमुख मगर यांनी दिली. ऐन दिवाळीच्या काळात हा संप पुकारल्यामुळे बाहेर जाणा-या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेक प्रवाशांना स्थानकावरच ताकळत राहावे लागले. लांब पल्यांच्या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचता आले नाही. या संपामुळे सामान्य नागरिकांना फटका बसल्याने शासकीय धोरणावर अनेक प्रवासी टीका करत होते. नारायणगाव आगारातील सर्व कर्मचा-यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला होता. बंदमध्ये सहभाग घेऊन घोषणाबाजी करत जोरदार ठिय्या आंदोलन केले. सकाळी ८ वा. बसस्थाकासमोरील महामार्गालगत आंदोलकांनी टाकलेला मंडप आगार व्यवस्थापक रामनाथ मगर, स्थानक प्रमुख उज्ज्वला टाकळकर यांनी पोलीस बळाचा वापर करून काढायला सांगितल्याने आंदोलक कर्मचारी कमालीचे संतप्त झाले होते. सर्वच आंदोलकांनी तीव्र घोषणा देत या घटनेचा निषेध केला. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले.
कर्मचा-यांना आंदोलनास मज्जाव, बेमुदत संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:52 AM