नगदवाडी, भोरवाडी, कांदळी या गावांना कांदळी सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. या ठिकाणच्या फिडरला क्षमतेपेक्षा जादा भार असल्याने दिवसभरात दोन तासही शेतीपंपांना वीज मिळत नाही.
शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात ४ तासही सुरळित वीज पुरवठा होत नाही. यामुळे नगदवाडी, भोरवाडी, सुतारठीके या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती क्षेत्रात वाढ झालेली आहे. उन्हाळी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. अनियमित वीजपुरवठ्याचा फटका या शेती पिकांना बसणार आहे. महावितरणने ताबडतोब इतर फिडरवरून विद्युत पुरवठा करावा किंवा फिडरची क्षमता वाढवावी;अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे शेतकरी योगेश बढे, प्रवीण बढे, संतोष बढे, धनंजय बढे, नामदेव पाचपुते, सखाराम बढे, शामराव बढे यांनी सांगितले.
याबाबत महावितरणचे पिंपळवंडीचे कनिष्ठ अभियंता अरविंद अंभोरे म्हणाले की, सर्व शेतकरी एकाच वेळी विद्युत पंप सुरू करत असल्याने फिडरवर लोड येतो व तो बंद पडतो. वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर दहा मेगावॅट क्षमतेचा फिडर या ठिकाणी बसविण्यात येईल.
बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देणे धोक्याचे
नगदवाडी, उंबरकास या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्याचे टाळतात. यामुळे दिवसा शेतकरी विदयुतपंप चालू करतात. सततचा विजपुरवठा खंडित होत असल्यामुळे फिडरची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.