लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्यांना दरामध्ये वाढ द्यावी, अशी मागणी जनशक्ती शेतकरी कामगार संघटनेने केली. ६४ रुपये लिटर डिझेल असताना होते तेच दर कारखानदार अजूनही देत असल्याचा दावा संघटनेने केला.
पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील म्हणाले, "ऊस क्षेत्रातील वाहतूकदार हा दुर्लक्षित घटक आहे. कारखानदारांकडून त्याची आर्थिक पिळवणूक होत आहे. ६४ रुपयांना मिळणारे डिझेल आता शंभरी पार होत आले तरीही अजून जुनेच दर आहेत. त्यामुळेच यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या २ महिने आधीच आम्ही ही मागणी करतो आहोत, त्याची दखल घ्यावी.
बहुतांश वाहतूकदार शेतकरीच आहेत. कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत. उसाची, कामगारांची वाहतूक करण्यासाठी कारखानदार त्यांना आगाऊ रक्कम देतात. कामगारांच्या टोळ्या पळून गेल्या की कारखानदार वाहतूकदारांकडून पैसे वसूल करतात, त्यासाठी धमकावणे, मारहाण करणे, ट्रॅक्टर जप्त करणे असे प्रकार केले जातात असा आरोप खुपसे पाटील यांनी केला. पैसे पुरेसे मिळत नाही, त्यात ही मारहाण सहन करावी लागते, कारखान्याला राजकीय आश्रय असल्याने याविरोधात आवाजही उठवला जात नाही असे ते म्हणाले.
साखर आयुक्त, सहकार मंत्री यांना याबाबतचे निवेदन दिले. आयुक्तांनी कारखानदार, वाहतूकदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी यावर निर्णय झाला नाही तर यंदाच्या हंगामात एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा खुपसे यांनी दिला. त्यांच्यासमवेत रोहन नाइकनवरे, भैरू इटकर, कल्याण गवळी उपस्थित होते.