हवेलीत महसुली कामांमध्ये दिरंगाई जास्त असल्याने ‘झिरो पेडन्सी’ हा शब्द महसूल अधिकारी व कर्मचारी विसरून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, कामाची आवकजावक भरपूर असल्याने वेळेवर कामे होत नसल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. पूर्व हवेलीतील नागरिकांना हवेली तहसील कार्यालय, खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे येथे येण्याकरिता वाहतूककोंडीच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने पूर्व भागातच कार्यालयीन इमारत झाल्यास येथील शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
यापूर्वीच हवेलीतील तहसील कार्यालयाच्या हद्दीतील ३० गावे अप्पर तहसील पिंपरी चिंचवडला जोडली असून, अद्यापही १३० गावांचा महसुली कारभार हवेली तहसील कार्यालयातून चालवला जात आहे. १३० गावांसाठी तालुक्यामध्ये ४६ तलाठी सजा असून यावर ८ मंडलाधिकारी आहेत. त्यामुळे काही तलाठ्यांकडे अतिरिक्त गावांतील कार्यभाराचा बोजा कायम असल्याने दोन्ही सजांमधील कामकाज पाहताना प्रलंबित कामकाजावरुन त्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.