पुणे : संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषत: राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे पुणेकरांनी मात्र खास 'पुणेरी' शैलीत आपली मते नोंदवली आहेत.
संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नाव बदलून ते जिजापूर करावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाची प्रत पाठवली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, हे नाव कोणत्याही धार्मिक आकसापोटी नाही तर जिजामातांच्या आदराप्रती बदलावे अशी आमची मागणी आहे.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या विषयावर लगेच प्रतिक्रिया देऊ नये असे वाटत असल्याचे सांगितले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनीही या विषयावर बोलण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी मात्र ब्रिगेडने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत सरकारनेच निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले. ब्राहमण महासंघाचे आनंद दवे यांनी नाव बदलण्यापेक्षा जिजाऊंचे योगदान बघून त्यांचे स्मारक करण्यात यावे असे मत व्यक्त केले. आमदार अनंत गाडगीळ यांनी मात्र नामांतराला विरोध केला आहे.
डॉ सतीश देसाई म्हणाले की, पुण्याचे पुणेरीपण टिकले पाहिजे. पुणेकरांच्या श्वासात पुणे आहे ते बदलता येणार नाही. लेखक मिलिंद शिंत्रे म्हणाले की, जिजाऊ माँसाहेबांविषयी आदर आहेच. त्यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यात असून तिथे नामांतर करणे अधिक संयुक्तिक ठरेल. परकीय शत्रूंनी आक्रमण केलेली नावे बदलणे समजू शकतो मात्र पुणे या परिघात बसत नाही. सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ म्हणाले की, पुणे या नावाला शौर्याचा, त्यागाचा, क्रांतिकारकांचा इतिहास आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याची आवश्यकता वाटत नाही. ढोल ताशा संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले की, नाव बदलून इतिहास बदलत नाही. पुणे या नावाला जाज्वल्य इतिहास आहे. तो बदलण्याचा अट्टाहास करणे चुकीचे आहे.