चाकण नगरपरिषद हद्दीतील नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर आगीच्या घटनाही वाढत आहे. घडणाऱ्या आगीच्या घटनांचा सामना करण्यासाठी नगरपरिषदकडे स्वतःचे अग्निशमन यंत्रणा नसल्याने अशा घटनांमधून मोठे नुकसान होते. यासाठी राज्य शासनाकडे शहर काँग्रेसने गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा केला होता. हा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने संचालक,राज्य अग्निशमन प्राधिकरणसह मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद यांना अग्निशमन यंत्रणा उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे लेखी पत्राने निर्देश दिले आहेत.
दरम्यानच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागा निवड निश्चिती करण्यात अडथळा निर्माण झाला होता. नगरपरिषद पिण्याच्या पाण्याची टाकी किंवा राक्षेवाडी गायरानात भामा नदीकारणाने अग्निशमन यंत्रणा केंद्र व गाडी शेड करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी निश्चित केले होते. परंतु कमिटीने ठरावात वेगळीच जागा निश्चित केली असून त्या जागेत सध्या व्यापारी गाळे आहेत. जनतेचे नुकसान करून अव्यवहार्य जागा नको. राक्षेवाडी गायरान किंवा पाण्याची टाकी येथेच अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशी मागणी प्रशासक, चाकण नगरपरिषद यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्ष आनंद गायकवाड, जमीरभाई काझी, निलेश कड, अमोल जाधव, दत्ता गोरे यांनी केली आहे.