विशाल शिर्के
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : राज्यात दररोज पावणेतेराशे टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील साधारण दोनशे साठ टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. कोरोनाचा उद्रेक झाल्याने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी नेहमीच्या तुलनेत सहा ते सात पटीने वाढली आहे. राज्याच्या उत्पादन क्षमतेच्या तीस टक्के उत्पादन पुण्यात होते. एकट्या पुणे जिल्ह्याची मागणी उत्पादनाहून अधिक झाली आहे.
राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ५९ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात दररोज नऊ ते साडेनऊ हजार रुग्णांची भर पडत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सात लाखांवर गेली आहे. मोठ्या संख्येने बाधित वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी सहा-सात पटींनी वाढली आहे. ऑटोमोबाईल, फॅब्रिकेशन, फोर्जिंग आणि स्टील उद्योगात ऑक्सिजनची आवश्यकता असते. राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूर येथे मोठे ऑक्सिजन प्रकल्प आहेत. त्यांची दैनंदिन क्षमता १२८७ टन आहे. त्यातील ३७६ टन ऑक्सिजन पुणे जिल्ह्यात तयार होतो. पुणे जिल्ह्यात २७ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर पाऊण लाखांहून अधिक रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. एकट्या पुणे शहराची ऑक्सिजनची दैनंदिन मागणी चारशे टनांहून अधिक झाली आहे.
——-
मराठवाड्यातील मागणी होणार विस्कळीत
पुणे जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सिजन औरंगाबाद, यवतमाळ, जालना, लातूर, बीड, अकोला, नांदेड, अहमदनगर येथे जातो. शहरातील मागणी वाढल्याने येथील ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होणार आहे.
——-
राज्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरला जातो. तर २० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी लागतो. मागणी वाढल्याने शंभर टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ४१७.७४ टन आहे. मात्र येथील वैद्यकीय मागणी पाचशे टनांच्या पुढे गेली आहे.
- सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग
——
दैनंदिन ऑक्सिजन निर्मिती
राज्याची क्षमता १२८७ टन
पुणे विभाग ४१७.७४ टन
—-
पुणे जिल्ह्यातील दैनंदिन उत्पादन क्षमता (टनांत)
कंपनी उत्पादन क्षमता
टायो निपॉन १००
आयनॉक्स १४९
एअर लिक्विड १२०
के चंद्रा ७