पुणे : कोरोनाबाधितांपैकी अनेक जणांना घरीच होम क्वारंटाईन होण्यास सांगण्यात येत आहे़ परंतु, काही घरात साधारण ५-६ जण राहत असल्याने, इतरांपासून विलग राहणे सर्वांनाच शक्य होत नाही. यामुळे महापालिकेने सीसीसी सेंटर पूर्वीप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयनिहाय सुरु करावेत. अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़
याबाबत धुमाळ यांनी, सीसीसी सेंटर्स व इतर सुविधा सद्यस्थितीत नसल्याने नागरिकांची शहरात पुन्हा हेळसांड होण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे़ तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून, कोरोनाबाधित रुग्णाला होम आयसोलेशन करणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे सीसीसी सेंटर तातडीने सुरू करणे जरूरी आहे़
तर सुतार यांनी, सीसीसी सेंटर सुरू करण्याबरोबरच स्वॅब सेंटरवरती होम क्वारंटाईनचे पत्र व औषध देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे़ याचबरोबर खाजगी रूग्णालयांशी त्वरित सामंजस्य करार करून मनपाच्या खाटा संबंधित रूग्णालयात राखीव कराव्यात़ व डॅशबोर्डवरील माहिती खरी व योग्य ती मिळेल याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे़
---------------------------