पुणे : बारावीच्या विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला न्यायालयाने जामीन मंजूर केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
अभिजित पवार असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पीडित मुलीने या शिक्षकाच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले. हे रेकॉर्डिंग ऐकल्यावर संतप्त पालकांनी शिक्षकाला महाविद्यालयात गाठून त्याच्या तोंडाला काळे फासत पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी आवाजाचा नमुना घेण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. त्याला बचावा पक्षातर्फे अॅड. पुष्कर दुर्गे यांनी विरोध केला. आरोपी २० तास पोलिसांच्या ताब्यात होता. त्या काळात ते आवाजाचा नमुना घेऊ शकले असते. या प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.