पुणे : राज्यभरातील विविध खासगी क्लास चालकांच्या संघटनांनी एकत्रित येत महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती स्थापन केली आहे. गेल्या चौदा माहिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लास बंद असल्याने चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने नियमावली आखून सुरक्षितरीत्या क्लास सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खासगी क्लास सुरू करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती देण्यासाठी, तसेच अन्य मागण्यांसाठी कृती समितीने मंगळवारी (दि. १५) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. समितीचे विजय पवार, सतीश देशमुख, दिलीप मेहेंदळे, रजनीकांत बोंद्रे, संतोष वासकर, बंडोपंत भुयार आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील सुमारे एक लाख खासगी क्लास बंद आहेत. त्यामुळे क्लास संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. जागाभाडे, पगार, दैनंदिन खर्च, वीजबिल हा खर्च भागवणे कठीण होऊन बसले आहे. तसेच सरकारने क्लास चालकांसाठी अद्याप कोणतेही धोरण ठरविलेले नसून मदत देखील दिली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही जिल्ह्यात काही अंशी क्लास सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी राज्यातील सर्वच क्लास चालकांना क्लास सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे असे समितीने सांगितले.
चौकट
समितीच्या मागण्या
* कोचिंग क्लाससाठी इतर व्यावसायिकांना मदत केली त्याप्रमाणे करावी.
* स्थानिक स्वराज्य संस्थांचे थकलेले कर माफ करावेत.
* सेवा कर म्हणून नाकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के करावा.
* कोचिंग क्लासेस ही व्यवस्था नियमित करण्यासाठी चेंबर ऑफ क्लासेस किंवा क्लासेस रेग्युलेटरी कमिटी सारख्या संस्थेला मान्यता द्यावी.
* कोचिंग क्लासला लघू उद्योगाचा दर्जा मिळावा.