भिगवण : येथे तोतया पोलीस अधिकारी बनून सराफाला गंडा घालणाºया जोडगोळीने बारामती तालुक्यात दहशत निर्माण करीत एकाच दिवशी आठ ते दहा ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. या भामट्यांनी सराफी दुकानात केलेल्या चोरीचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. या जोडगोळीच्या कारनाम्याने घाबरून गेलेल्या सराफ व्यावसायिकांनी एकत्र येत बारामती शहर पोलीस ठाणे तसेच विभागीय पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांना निवेदन देत सराफी पेढीला संरक्षण देण्याची मागणी केली.
सोमवारी भिगवण येथील दतात्रय हाके यांच्या पद्मावती ज्वेलर्स मध्ये १७.५ ग्राम वजनाच्या ४८ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारीत पोबारा केला होता. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याच चोरट्यांनी दुसºयाच दिवशी बारामती मोरगाव, नीरा, सुपा, लोणंद, मुर्टी, फलटण येथील सराफी दुकानात जात चोरीचा प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांना चोरी करता आली तर काही ठिकाणी त्यांना मोकळ्या हाताने पळ काढावा लागला. यामध्ये बारामती येथील सुधीर पोतदार, भागवत पंडित, नागेश वेदपाठक भारत लोळगे यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. तर याठिकाणी या दुकानदारांनी वेळीच सावधान होत या चोरट्याच्या हाती काही लागू दिले नाही. तर मोरगाव येथील वीरेंद्र कुंभार यांच्या श्रीपाद ज्वेलर्स या दुकानात या चोरट्यांनी बळजबरी करीत गल्ला आणि वस्तूंच्या बॉक्स ला हात घातला होता. कुंभार यांनी त्यांना प्रतिबंध करीत दुकानातून हाकलून दिले. यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा नीरा गावाकडे वळवीत या ठिकाणी असणाºया दोन तीन सराफी पेढ्यात चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सराफ व्यावसायिकांनी सबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे माहिती मिळाली नाही. तर या प्रकाराने घाबरून गेलेल्या सराफ व्यावसायिकांनी बारामती विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांची भेट घेत निवेदन देवून सराफी पेढीला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच यावेळी सराफ कट्टा बंदोबस्त करण्यासाठी असणाºया पोलीस अधिकाºयाला माहिती देवूनही त्या कडे दुर्लक्ष केल्याची माहिती दिली. तर गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाºया जोडगोळीला पोलीस दिवसाढवळ्या दुचाकीवर फिरून चोरी करीत असताना पकडत नसल्यामुळे सराफांमध्ये भीती पसरत आहे. तर सराफ आपल्या दुकानात चोरी होऊनही तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करीत असल्याने पोलीस कारवाईत मर्यादा येताना दिसून येत आहेत.धिप्पाड शरीरयष्टी, अधिकाºयांप्रमाणे वेशभूषा आणि चालण्याची लकब सोबत सलाम घालण्यासाठी कनिष्ठ कर्मचारी अशा थाटात सराफी दुकानात प्रवेश करत सराफांचे लक्ष विचलित करून चोरी करणाºया जोडगोळीने जिल्ह्यातील सराफांची झोप उडवली आहे.
चोरट्यांनी सुपा, लोणंद, फलटण तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी याठिकाणी अशीच भामटेगिरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी त्यांनी वस्तू चोरल्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आलेले आहे. यात या चोरांची करामत दिसून येत आहे.