शिरूर विधानसभा काँग्रेसला सोडण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:33 AM2018-12-20T01:33:54+5:302018-12-20T01:34:27+5:30
गतवर्षी राष्ट्रवादीचा पराभव : खेड आणि जुन्नरमध्ये काँग्रेस भक्कम असल्याचा दावा
महाळुंगे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व खेड या दोन विधानसभा मतदारसंघातील जागा काँग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी माझ्यासह येथील कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जगताप म्हणाले, की खेड आणि जुन्नर येथे काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. गेली अनेक वर्षे आघाडी असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून राष्ट्रवादीचे काम निष्ठेने करीत आहेत. मात्र येथे प्रत्यक्ष निवडणूक लढवून काम करण्याची संधी येथील नेत्यांना कधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असते. त्यामुळे जर येथे काँग्रेसला संधी मिळाली नाही तर येथील काँग्रेस पक्षच नामशेष होण्याची भीती हायकमांडकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा जुन्नर व खेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशामुळे येथील तरुण कार्यकर्त्यांमध्ये आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्या पाच राज्यांच्या पुनरावृत्ती महाराष्ट्रातही करण्यासाठी सध्या कार्यकर्ते प्राण पणाला लावून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यंदा या दोन्ही जागा काँग्रेसलाच सोडाव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. शिवाय मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव पाहता आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे येईलच, असे मानले जात आहे.
राहुल गांधींच्या विचारातील उमेदवार
सध्या राहुल गांधी यांंच्या टीममध्ये सर्वत्र तरुण कार्यकर्ते नेते आहेत. पाच राज्यासह देशभरात राहुल गांधींकडून युवकांना संधी दिली जात आहे. त्याचाच फायदा जुन्नर व खेड विधानसभा मतदाससंघातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांनी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहेच; शिवाय शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा त्यांना असल्याने हे नाव जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे. माजी आमदार (स्व.) नारायणराव पवार यांचे मानसपुत्र आणि खेड तालुक्यातील एकमेव पंचायत समितीचे एकमेव काँग्रेसचे सदस्य अमोल पवार यांचे नाव खेड विधानसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे. खेड तालुक्यातील परिवर्तन आघाडीचे ते प्रमुख आहेत. ही परिवर्तन आघाडी म्हणजे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याविरोधात एकवटलेली खेड तालुक्यातील नेतेमंडळींची कार्यकारिणी यामध्ये अमोल पवार यांचे कार्य मुख्य होते. या परिवर्तन आघाडीमुळे दिलीप मोहिते यांनी २०१४ च्या विधानसभेत मोठे नुकसान सोसावे लागले आणि पराजयाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या दोघांना संधी दिली जावी, अशी मागणीही केली जात आहे.