पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये ऑक्सिजनवरील रुग्ण वाढत असून अत्यवस्थ रूग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांकरिता पालिकेकडून रेमीडिसिव्हर इंजेक्शन खरेदी केले जात असून, तूर्तास आवश्यकतेनुसार त्याची खरेदी केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी रुग्ण वाढल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्ण मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. अत्यवस्थ रुग्णांना रेमीडिसिव्हर इंजेक्शन वरदान ठरले होते. राजकीय पक्षांकडूनही या इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. या इंजेक्शनची मागणी वाढली होती. या इंजेक्शनमुळे अत्यवस्थ रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासाही मिळाला होता. त्यामुळे या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात होती. शासनाला इंजेक्शनचे दर निश्चित करावे लागले होते.
ऑक्टोबरनंतर रुग्ण कमी झाल्याने या इंजेक्शनची मागणी कमी झाली होती. परंतु, शहरातील रुग्णवाढ पुन्हा सुरू झाल्याने रेमीडिसिव्हरची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या तुलनेत मात्र ही मागणी कमी असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय दरानुसार, या इंजेक्शनची खरेदी करण्यात येत असून बाणेर कोविड सेंटर, शिवाजीनगरचे दळवी रुग्णालय आणि डॉ. नायडू रुग्णालय या रुग्णालयांमधून जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून इंजेक्शन पुरविले जाते आहे. शासनाकडून नुकतेच पुन्हा या इंजेक्शनचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास मोठया प्रमाणावर खरेदी केली जाऊ शकते.