बारामती - मळद (ता. बारामती) येथील अमोल बापूराव भापकर या तरुणाने मराठा आरक्षणासाठी बुधवारी (दि. १५) महावितरणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह येथे जमलेल्या मराठा तरुणांनी अमोलशी फोनवरून संवाद साधत खाली उतरण्याची विनंती केली. मोठ्या प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरण्यात पोलिसांनी यश आले.आरक्षण मागणीसाठी तरुण-तरुणींनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. ९ आॅगस्टच्या क्रांतिदिनानंतर राज्यभरात शांततेत आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला.स्वातंत्र्यदिनादिवशी हा तरुण उच्चदाब वाहक तारा असलेल्या टॉवरवर चढल्याने प्रशासनाची पाचावर धारण बसली होती. त्याने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.त्याला खाली उतरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. तसेच विनवणीदेखील केली. तरुण टॉवरवर चढल्याचे कळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीसनिरीक्षक विठ्ठल दबडे घटनास्थळी हजर झाले.पोलिसांनीदेखील त्याला खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी जमावापैकी एकाने खासदार सुळे यांना माहिती देत त्याचा मोबाईल क्रमांकदेखील दिला. सुळे यांनी मोबाईलवर संपर्क साधून त्याला खाली उतरण्याची विनंती केली. मोठ्या प्रयत्नानंतर हा तरुण टॉवरवरून खाली उतरला.
उच्चदाब टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:56 PM