पुणे : मुक्त परवाना धोरण बंद करावे, विमा मुदतीत वाढ करावी या रिक्षाचालकांच्या मागण्या जिल्हा वाहतूक प्राधिकरणाची मंगळवारी होणारी बैठक रद्द झाल्याने पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या. या मागण्यांसाठी रिक्षा पंचायतीच्या वतीने मागील चार महिन्यांपासून वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी जिल्हा वाहतूक प्राधिकरणाला रिक्षाचालकांच्या मागण्या बैठकीच्या विषयपत्रिकेत घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी होणाºया बैठकीत या दोन्ही विषयांवर चर्चा होणार होती, मात्र राज्य सरकारने मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियोजनात प्रशासन गुंतल्यामुळे मंगळवारची ही बैठक आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. गरीब रिक्षाचालकांच्या दु:खाशी प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही हेच यावरून सिद्ध होते अशी खंत यावर रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी व्यक्त केली.
रिक्षा चालकांची मागणी पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:11 AM