लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: लक्ष्मी रस्त्यावर रिक्षा थांब्यांसाठी जागा द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या रिक्षा संघटनेने केली आहे. फक्त लक्ष्मी रस्ताच नाही तर जंगली महाराज रस्ता व बाजारपेठेतील अन्य रस्त्यांवरही व्यवसायासाठी थांबण्याचा रिक्षाचालकांचा हक्क त्यांना परत द्यावा असे पत्रच महापालिकेला देण्यात आले आहे.
आप रिक्षा संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत आचार्य यांनी हे पत्र दिले आहे. लक्ष्मी रस्ता तसेच शहरातील विविध बाजारपेठेच्या रस्त्यांवर समविषम अशा प्रकाराने वाहने लावता येतात. वाहनांच्या संख्येचा विचार करता या रस्त्यांवर वाहन लावण्यासाठी जागा सापडणे मुश्कील झाले आहे.
त्यातही अनेक दुकानमालक तसेच काही ग्राहकही आपले वाहन तिथेच लावून दिवसभर जागा अडवून ठेवतात.
यात व्यवसायासाठी रस्त्यावर थांबा असण्याचा रिक्षा चालकांचा हक्क नाकारला जातो आहे. या सर्वच रस्त्यांवर साधारण १२०० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी लावलेल्या असतात. त्याऐवजी फक्त १ हजार दुचाकींना परवानगी द्यावी व उर्वरित जागेवर रिक्षासाठी थांबे करावेत. त्यामुळे पायी येणाºया ग्राहकांना रस्त्यावरच रिक्षा मिळेल, त्यांचा व्यवसायही वाढेल व खरेदी केल्यानंतरच लगेचच रिक्षा मिळत असल्याने ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. दुकानमालकांचा व्यवसाय यामध्ये वाढणार असल्याने त्यांनी आप रिक्षा संघटनेच्या या मागणीला पाठिंबा द्यावा असेही आवाहन आचार्य यांनी केले आहे. महापालिका आयुक्त, वाहतूक शाखा प्रमुख यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.