पुणे : भारतीय मजदूर संघाने राज्यातील असंघटित कामगारांंना १० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली. संघटनेच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करून तो सरकारकडे पाठवण्यात आला.
मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. कोरोनामुळे असंघटित क्षेत्रातील असंख्य गरीब कामगारांचा रोजगार गेला. यात रिक्षाचालकांपासून ते कचरा वेचकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. अजूनही परिस्थिती खराबच असल्याने त्यांचे जगण्याचे हाल होत आहेत. सरकारने त्यांना किमान १० हजार रुपयांची मदत करावी, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
प्रदेश सरचिटणीस मोहन येणुरे, संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, विशाल मोहिते, हरी चव्हाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर, १७ सप्टेबरला संघटना आंदोलन करणार, असा इशाराही देण्यात आला.