लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: नववर्षाची चाहूल लागल्यानंतर दरवर्षी नववर्षाच्या डायऱ्या, दैनंदिनींची विक्री चालू होते. पुण्यासारख्या शहरात लाखोंंच्या संख्येने या डायऱ्या विकल्या जातात. यंदा मात्र या डायऱ्यांनाची मागणी घटल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये अजूनही सुरू झालेली नाहीत. शालेय वस्तू, वह्या, पुस्तके, स्टेशनरी या गोष्टींचीही विक्री झालेली नाही. त्यामुळेच पुस्तक आणि वही विक्रेत्यांना नववर्ष डायऱ्यांच्या विक्रीची प्रतीक्षा आहे.
दरवर्षी डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच डायरी आणि कॅलेंडर विक्रीला सुरुवात होते. वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत डायऱ्या आता येऊ लागल्या आहेत. त्यात धार्मिकतेपासून अर्थकारणापर्यंत आणि मन:स्वास्थ्यापासून आरोग्यापर्यंतचे अनेक विषय असतात. नववर्षाची भेट म्हणून या डायऱ्या देण्याची प्रथा आहे. या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत असते. डिसेंबरच्या मध्यापर्यंत डायरी विक्री जोरात सुरु झालेली असते. यंदा मात्र असे कोणतेही चित्र बाजारात नाही.
यंदा डायरी उत्पादन निम्याने घसरले आहे. त्यामुळे दुकानदारांकडे माल कमीच आहे. मात्र तोही विकला जात नसल्याचे सांगण्यात आले. विक्रेते विशाल सावला म्हणाले की एरवी आतापर्यंत ५-६ हजार डायऱ्यांची विक्री झालेली असते. पण यंदा जेमतेम दोनशे डायऱ्या विकल्या गेल्या आहेत. कंपन्या किंवा बड्या कार्यालयांकडूनही यंदा विचारणा झालेली नाही.
चौकट
“८० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत डायऱ्या उपलब्ध आहेत. शाळा-महाविद्यालयातील मुलं-मुली डायऱ्या घेण्यासाठी येत असतात. यंदा त्यांची गर्दी अजिबातच नाही. दरवर्षी आमच्या सहा शाखांमधून ५० हजाांच्या आसपास डायऱ्या विकल्या जातात. यंदा ५० टक्के विक्री होणंही अवघड वाटत आहे.”
विनोद करमचंदानी, स्टेशनरी व्यावसायिक
चौकट
“यंदा कोरोनामुळे नववर्षाच्या डायऱ्या कमी आल्या आहेत. मोठे ग्राहक नाहीत. सगळेजण कोरोनाचे कारण देत आहेत. ‘डिजिटल’मुळेही डायरी वापराचे प्रमाण कमी झाले आहे. व्यक्तिगत वापरासाठीचे तुरळक ग्राहक डायऱ्या खरेदी करत आहेत.”
-उत्कर्ष जोशी, विक्रेते