हॅप्पी कॉलनी परिसरात दहा वर्षा पूर्वी हे सहा रुग्णालय उभारण्यात आले होते. सध्या या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित असून तेथे प्राथमिक उपचार दिले जातात. या ठिकाणी सध्या लसीकरण केंद्र सुरु आहे. या ठिकाणी अजून १२ हजार ५०० चौरस फुट अद्ययावत रुग्णालय उभे रहावे म्हणून पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतुद करण्यात आली होती. परंतु, दहा वर्षात रुग्णालयाच्या वरील मजल्यावरील आवश्यक त्या सेवासुविधांची कामे पूर्ण न झाल्याने उर्वरित मजले बंद स्थितीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात बेड उपलब्ध होत नाहीत. उपचारांअभावी अनेक जणांना जीव गमवावे लागत आहेत. पालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार देताना आरोग्यसुविधा अपु-या पडत आहेत. अशा वेळी बाहयरुग्ण विभाग वगळून जवळपास १५० ते २०० खाटांच्या रुग्णालयाची जागा वापरा अभावी पडून आहे. या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरु झाल्यास कोथरूड, वारजे, कर्वेनगर या उपनगरातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी अद्यावत कोविड सेंटर त्वरित उभे करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, विभागप्रमुख ॲड. योगेश मोकाटे यांनी केली आहे.