केडगाव : उपशामुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडते, त्यामुळे अवैध वाळूउपसा थांबविण्यासाठी व कृत्रिम वाळूला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात केली आहे.
नियम २९३ अन्वये विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. कुल म्हणाले, मी ज्या भागातून येतो त्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम अवैध वाळूउपशामुळे होत आहे. ग्रामीण भागातील सामाजिक ताणतणाव याचा विचार करून शासनाने वाळूउपशाच्या संदर्भातले दूरगामी धोरण हाती घेण्याची आवश्यकता आहे. पुण्यासारख्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेगाो इमारती उभ्या राहत असताना तसेच, उद्योग येत असताना वाळूची आवश्यकता आहे. परंतु राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नोव्हेंबर २०१७ च्या सुमारास वाळूउपशाला बंदी घातल्यामुळे वाळूचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तो आदेश मान्य करणे योग्य आहे आणि दुसरा बाजूला वाळूची आवश्यकता आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा वाळूच्या तुटवड्यावर झाल्यामुळे वाळू, मुरूम, माती या अवैध स्वरूपाचा उपसा जिल्हा आणि परिसरामध्ये होतो. वाळूची आवश्यकता आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही, परंतु त्यासाठी असलेल्या स्टोन क्रेशरच्या आणि नव्याने विकसित झालेल्या कृत्रिम वाळूचा बाबतीत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मुळातच एका बाजूला अवैध वाळू आणि दुसऱ्या बाजूला वाळूची असलेली आवश्यकता याचा समतोल घडवण्याची आवश्यकता आहे.