भाजपा युवा मोर्चाचे तेजस देवकाते यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग ५४ मदनवाडी-पोंधवडी-अकोले-बागवाडी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यातील मदनवाडी-पोंधवडी या ० ते ५ किलोमीटर टप्प्याचा निधी वर्ग करण्यात आला असून याचे भूमिपूजन मदनवाडी येथे करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कोणतेही काम सुरू करत असताना या ठिकाणी फलक लावणे बंधनकारक असते. मात्र, या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. तर सुरुवातीच्या टप्प्यात मदनवाडी येथून कामाची सुरुवात करणे आवश्यक असताना ठेकेदार मध्यापासून काम करीत असल्यामुळे मदनवाडी नागरिकांना याचा त्रास होत आहे. तर शेवटच्या टप्प्यात दोन शेतकऱ्यांच्या वादातून काम करता येत नसल्यामुळे रस्त्याच्या कामाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर पाठीमागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मदनवाडी येथील वर्दळीच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना सार्वजनिक बांधकाम खाते या ठिकाणाहून सुरुवात करणे गरजेचे असताना मध्यापासून सुरुवात का करत आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे नुसत्या कोटींच्या विकासकामांचा डांगोरा पिटण्याऐवजी कामाच्या प्रतवारीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत देवकाते यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे अनेक वेळा निधी येऊनही या रस्त्याचे नशीब पालटले नाही, तर हा रस्ता अनेक वेळा राजकीय गटतट, तसेच शेतकऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अडविला जात आहे. आता राज्यमंत्री भरणे यांनी निधी दिला असल्यामुळे आतातरी हा रस्ता पूर्ण होऊन महामार्गावर जात जीवाला धोक्यात घालणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय? असा सवाल निर्माण होतो. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.