रांजणगाव सांडस : राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे विविध उद्योगधंदे अडचणीत आलेले आहे. त्याचा फटका कळत न कळत ऊस उत्पादक शेतकऱ्यालाही बसला आहे. रसवंतीगृहासाठी लागणाऱ्या उसाची मागणी यंदा घटली असल्यामुळे शेतकऱ्याला हमखास मिळणारे पैसे यंदा कमी झाले.
दोन वर्षापासून ऐन उन्हाळ्यातच लॉकडाऊन सुरू होत असल्यामुळे रसवंती गृह बंद राहिले. त्यामुळे रसवंती चालकांनी उसाची मागणीच केली नाही. विशेषत: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, वडगाव रासाई, मांडवगण फराटा या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस अगदीच कमी विकला गेला. या भागातील ऊसला गोडी असल्याने हा ऊस साखर कारखाना, गूळ बनवणारे गुन्हाळ तसेच रसवंतीगृह येथे मोठ्या प्रमाणात जातो. रांजणगाव सांडस येथील उसाला तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान पुणे, मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या दोन वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाने उसाला प्रतिटन चार हजार रुपये नुसार दर घेतला होता . परंतु यावर्षी रसवंती गृहसाठी उसाला मागणी नसल्यामुळे दर घसरला.
--
गुऱ्हाळघराने ऊस उत्पादकांना तारले
साखर कारखाने बंद झाले की ऊस उत्पादकांकडून गुऱ्हाळाला ऊसपुरवठा सुरू होतो. या भागांमध्ये अनेक युवा उद्योजक यांनी गूळ बनवणारे प्रकल्प, गुऱ्हाळ व्यवसाय चालू केल्यामुळे या भागातील उसाला आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गूळ बनविणाऱ्या गुऱ्हाळासाठी उसाचा प्रति टन दर २५ हजार ते २६ हजार रुपयांपर्यंत असल्यामुळे शेतकरी गुऱ्हाळघराला उस देणे पसंत करत आहेत.