पुणे : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे सर्व पर्यटनस्थळे हाऊस फुल झाली असून, पुणे, मुंबईसह हैद्राबाद, अहमदाबाद आदी सर्व ठिकाणांहून स्वीटकॉर्नला मागणी वाढली आहे. सध्या मार्केट यार्डात दररोज ५० ते ६० टन आवक होत आहे. मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळाला आहे.सध्या स्वीटकॉर्नला प्रतिकिलोस १५ ते १८ रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी पांडूरंग सुपेकर यांनी दिली. गतवर्षी दुष्काळामुळे स्वीटकॉर्नच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला होता. उत्पादन घटल्यामुळे गेल्या वर्षीच्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत होता. यंदादेखील स्वीटकॉर्नच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे. यामुळे मार्केट यार्डात सध्या केवळ पन्नास टक्केच आवक होत असल्याने चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षी दहा ते बारा रुपये प्रतिकिलो दर मिळाले होते. परंतु यंदा त्या तुलनेत तीस ते चाळीस टक्क्यांनी दर वाढले आहेत़. गुलटेकडी मार्केट यार्डात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागातून तर काही प्रमाणात नाशिक जिल्ह्यातून देखील स्वीटकॉर्नची आवक होत आहे. सध्या दररोज सुमारे ५० ते ६० टन इतकी आवक होत आहे. गेल्या वर्षी या काळात दररोज सुमारे १०० ते १२५ टन इतकी आवक होत होती़. महाबळेश्वर, खडकवासला, लवासा, लोणावळ्यासह विविध पर्यटनस्थळे आणि परराज्यातून हैदराबाद येथून मागणी आहे. गुजरात, बडोदा येथून मागणी आहे. तुलनेने आता आवकही वाढली आहे़.
पावसाळ्यात स्वीटकॉर्नला मागणी : शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 3:10 PM