बावडा : वीर- भाटघर व परिसरातील सर्व साखळी धरणांमध्ये सध्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली (ता. इंदापूर) तलावामध्ये विलंब न लावता तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली आहे.
सध्या नीरा डावा कालव्यातून लाभक्षेत्रात शेतीला आवर्तन दिले जात आहे. त्यामुळे नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आठवडाभरात शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडणे सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील पुढे म्हणाले, बावडा व परिसरातील ८ गावांमधील शेती आणि एकूण १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना शेटफळ हवेली तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र सध्या हा परिसर कोरडा ठणठणीत आहे. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये बावडा तसेच भोडणी, वकीलवस्ती, सराटी, नीरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी ही गावे येतात. या गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेटफळचे आवर्तन हे उन्हाळ्यात मे महिन्यात देण्यात आलेले होते. त्यानंतर तलाव कोरडा असल्याने शेतकºयांना आवर्तन देण्यात आले नाही. परिणामी, या परिसरातीलच पिके करपून चालली असून, धोक्यात आली आहेत. जर शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही तर मात्र वर्षभरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे अधीक्षक अभियंता चोपडे यांच्याशी बोलताना पाटील यांनी नमूद केले. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता ६२० दलघमी आहे. सध्या वीर भाटघर आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील बावडा व परिसरातील गावांमधील पिकांची पावसाअभावी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आता कालावधी कमी असल्याने शेटफळ तलावात तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात करून, तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.