पुणे : मित्राच्या आजोबांना ४ वर्षांपूर्वी उसने दिलेले ५० हजार रुपये परत मागितल्याने त्यांच्या नातवाने साथीदारांच्या मदतीने कोयत्याने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी रात्री साडेदहा वाजता साहिल शेख याच्या घरासमोर घडला.
याप्रकरणी अम्मार मुक्तार शेख (वय २८, रा. आशियाना सोसायटी, सय्यदनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल शेख (वय २२), नौमान सय्यद आणि जमीर शेख (सर्व रा. हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी साहिल शेख हे मित्र आहेत. साहिलचे आजोबा मोहम्मद यांना ४ वर्षांपूर्वी फिर्यादीने ५० हजार रुपये उसने दिले होते. गेल्या आठवड्यात साहिलच्या आईने त्यांचे राहते घर विकले. त्यामुळे साहिल व त्याचे आजोबा यांच्याकडे फिर्यादीने पैसे परत मागितले. परंतु तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. २६ जूनरोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी हे पान आणण्यासाठी फॉरच्युन प्लाझा येथे गेले. तेथे साहिल होता. त्यांनी उसने पैसे परत करण्यास सांगितले. त्याने येण्यास नकार दिल्यावर फिर्यादी एकटेच त्याच्या आजोबांकडे गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला. त्याचवेळी साहिल, त्याचा मित्र नौमान सय्यद, साहिलचे मामा जमीर शेख हे तेथे आले.
साहिल याने फिर्यादींना बांबूने मारहाण केली. जमीर याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. साहिल म्हणाला की, पैसे मांगता है क्या, तेरे को दिखाता हू, तेरे को आज जिंदा छोडुंगा नही, असे म्हणत पाठीवर, हातावर मारहाण केली. नौमान याने "आज तेरा गेम बजा डालते है," असे बोलून कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात वार केला. तेव्हा फिर्यादी जमिनीवर पडले. जीव वाचविण्यासाठी आराेपींच्या तावडीतून निसटून बिल्डिंगच्या टेरेसवर पळ काढला. टेरेसचा दरवाजा लावून घेतला. मित्राबरोबर हडपसर पोलीस ठाणे गाठत फिर्याद देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यावर १४ टाके घातले. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.