पिंपरी सांडस : हिंगणगाव (ता. हवेली) येथील सरकारी गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून लावण्यात आलेली लिंब, बाभूळ आदी झाडांची कत्तल करून गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवासी संतोष काची यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह वनविभाग व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचेकडे केली आहे.
हिंगणगाव (ता. हवेली) येथील गट नं. १४८ मधील १२ हेक्टर २८ आर सरकारी गायरान जमीन शासनाने फेरफार नं. ४६ व ३७३ अन्वये हिंगणगाव ग्रामपंचायतीस देखभाल करण्यासाठी व सार्वजनिक वापरासाठी दिलेली आहे. ७/१२ पत्रकी हिंगणगाव ग्रामपंचायतीची नोंद इतर हक्क दाखल आहे. या गायरान जमिनीवर सात-आठ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने लिंब, बाभूळ आदी झाडे लावली होती. परंतु गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पुढाऱ्यांना हाताशी धरून गायरान जमिनीवर असलेली मोठमोठी झाडे व झुडपे तोडून या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. हिंगणगावातील ग्रामस्थ हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्याकडे शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यांसारखी दुभती जनावरे आहेत. ग्रामस्थांना जनावरांच्या चाऱ्यासाठी सदर गायरान गट नं. १४८ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र येथील मूठभर लोकांनी दंडेलशाही करून गायरान जमिनीवरील वृक्षतोड करून अतिक्रमण केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत.
मतदानावर डोळा असणाऱ्या काही गावांतील पुढाऱ्यांकडून जाणूनबुजून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाची हानी झाली असून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी हतबल झाला असताना जनावरांना चार कुठून आणायचा? या विवंचनेत सापडला आहे. गायरान जमिनीवरील झाडे तोडून अतिक्रमण करणाऱ्या गुंड प्रवृतींवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस दिली आहे. तसेच याबाबत तलाठी कार्यालयाला कळविले असून ग्रामपंचायतीला सहा महिन्यांच्या आतील अतिक्रमण असतील तर ते काढण्याचा अधिकार आहे. परंतु ही अतिक्रमणे आठ-नऊ वर्षांपूर्वीची असल्यामुळे ही काढण्याचे अधिकार नाहीत.
- सुवर्णा लोंढे, ग्रामसेविका, हिंगणगाव
130821\img-20210628-wa0112.jpg
फोटोच्या ओळी :-गायरान जमिनीतील झाडे झुडपे काढून अतिक्रमण केलेले क्षेत्र.